नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी सुमारे साडे तीन हजार विद्यार्थ्यांनी मानवी आकृती काढली. विद्यार्थी सकाळी आठ वाजेपासून कडाक्याच्या थंडीत जमिनीवर बसले होते. मात्र, प्रशासनातील अधिकारी दोन तास उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना कुडकुडत थंडीमध्ये बसावे लागले. दरम्यान, विद्यार्थ्यांची आरोग्याची जबाबदारी ही प्रत्येक शाळेचा शिक्षकांवरती असते. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणे ही शिक्षकांची जबाबदारी असते. यापुढे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांना का जावे ? असे अनेक प्रश्नांच्या चर्चा पटांगणावर सुरु होती. त्यामुळे शासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार , सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी , शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे , उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण , गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील हे उपस्थित होते.
शहरातील कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एकलव्य विद्यालय व ज्यू कॉलेज, डी.आर. हायस्कूल व डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, यशवंत विद्यालय या विद्यालयातील ११वी, १२वीचे विद्यार्थी असे एकूण साडेतीन हजार विद्यार्थी या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते.
महाविद्यालयातील प्राचार्यांना सांगण्यात आले की, सकाळी साडे नऊ वाजेच्या कार्यक्रम आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयातील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना भर थंडीत शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगणावर VOTE FOR NANDURBAR या प्रतिकृती आकृतीत बसविण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात लवकर होणे अपेक्षित असताना देखील प्रशासनातील अधिकारी वर्ग उशिरा आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास बुडवून थंडीमध्ये कुडकुडत बसावे लागले. त्यामुळे ‘आम्हाला थंडीमध्ये पटांगावर बोलून बसून ठेवले. शासनाचे यापुढील कार्यक्रम वेळेवर सुरू होत नसेल तर आम्हाला बोलवू नये’ अश्या चर्चा प्रत्येक शाळेतील शिक्षक-विद्यार्थी करत होते.