राहुल गांधींची तुलना शिवाजी महाराजांशी, भाजप आक्रमक; काँग्रेस अडचणीत

मुंबई : काँग्रेसने राहुल गांधी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. यामुळे राज्यात भाजप आक्रमक झाली आहे.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात भारत जोडो यात्रेसह कर्नाटक निवडणूक आणि इतर ठिकाणीचे राहुल गांधी यांचे व्हिडिओ आणि फोटो आहेत. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचं आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.

या व्हिडिओत राहुल गांधी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी यांच्यांशी केल्याचा आरोप भाजपने आता केलाय. काँग्रेसने हा व्हिडिओ तातडीने डिलीट करुन माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. शिवरायांसमोर राहुल गांधी हे मायनस झिरो झिरो आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे.

राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी भाजप युवा मोर्चाने जोरदार निदर्शने करत राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा भाजप व काँग्रेस आमनेसामने आले आहे.