नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचीही आठवण करुन दिली.
राहुल गांधी यांनी परदेश दौर्यादरम्यान केलेल्या वक्तव्यांवर जे पी नड्डा यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असताना ‘काँग्रेसचे युवराज’ राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत. ज्या व्यक्तीची आजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. लोकशाहीचा आवाज दाबला होता. ती व्यक्ती आपल्या परदेश दौर्यामध्ये, भारतविरोधी लोकांच्या भेटीदरम्यान लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत आहे, असंही टीकास्त्र नड्डा यांनी डागलंय.
जे पी नड्डा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केलेत. यात त्यांनी मोदी सरकारच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसंच भविष्यातील योजनांचाही आढावा घेतला आहे. आज महा-जनसंपर्क अभियान पंजाब के होशियारपूरमध्ये आयोजित जनसभेला संबोधित केलं. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या ९ वर्षांमध्ये गरीब कल्याण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक कार्य केलं जात आहे. या ‘अमृतकाल’मध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश करण्याचं मोदीजींचं लक्ष आहे. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं नड्डा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.