जळगाव : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. जळगावात देखील आज भाजपातर्फे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘काँग्रेसची पक्षाची भूमिका आहे की, आरक्षण रद्द झाले पाहिजे, आरक्षण आम्ही काढून टाकू’, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका इंटरव्यूत केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जळगावात भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले.
परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हा राहुल गांधींचा उद्योगच झाला आहे. एकीकडे आपले प्रधानमंत्री आपल्या भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च देश बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी स्वतःच्याच देशाविषयी चुकीचे भाष्य करून आपल्या देशाचा आणि देशवासीयांच्या अपमान करत आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. मुळात तो हक्क कोणालाही नाही जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तोपर्यंत कोणीच आरक्षण काढू शकत नाही हे स्वतः मा.मोदी यांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलेले आहे.
पूर्वी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष देशात सत्तेत राहिला तेव्हा त्यांच्या काळात दलितांवर अनेक प्रकारचे अत्याचार झाले, अन्याय झाला. पण भारतीय जनता पार्टी हे होऊ देणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्ह्याध्यक्ष उज्वला भेंडाळे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जडकेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.