राहुल नार्वेकर क्रांतीकारी निर्णय घेणार म्हणताच गिरीश महाजनांनी लावला डोक्याला हात

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. याच दरम्यान त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रीपदं भूषवलेले दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’ याचा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी समोर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार-मंत्रीही बसले होते. यावेळी आपल्या भाषणात राहुल नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच दिले. त्यांच्या या विधानावर समोर बसलेले मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क डोक्यालाच हात लावला.

राहुल नार्वेकरांनी यावेळी बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. ज्या ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केलं, त्या त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी म्हणजे १९७७-७८ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम, असं राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष असतांना बाळासाहेब देसाई यांनी राजकीय आयुष्यात क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसं शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन, असे सूतोवाच राहुल नार्वेकरांनी दिले. दरम्यान, याचवेळी समोर बसलेल्या गिरीश महाजनांनी डोक्याला हात लावला. समोरच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पाहून नार्वेकरांनी लागलीच चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही, असं म्हणत बाजू सांभाळून घेतली. त्यावर गिरीश महाजनांनी बसल्या बसल्याच ‘मेरिटवर निर्णय’ असं हसत म्हणताच नार्वेकरांनी त्याला दुजोरा देत मेरिटवर निर्णय घेईन, असं सांगून टाकलं.