“राहूल गांधींनाही आता ओबीसींची आठवण यायला लागली”

काँग्रेसने आता मोहब्बत की दुकान उघडली आहे. पण मला एक कळत नाही की प्रेम दुकानात कधीपासून मिळायला लागलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वाशीम दौऱ्यावर असून ओबीसींच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राहूल गांधींनादेखील आता ओबीसींची आठवण यायला लागली आहे. आतापर्यंत ती नव्हती येत. त्यांना आठवण यायला लागली ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले आहेत.
तसेच पुढे ते म्हणाले की आता काँग्रेसने मोहब्बत की दुकान उघडली आहे. पण मला एक समजत नाही की प्रेम दुकानात कधीपासून मिळायला लागलं. प्रेम मनात असायला हवं जे मोदीजींच्या मनात आहे. तुम्ही दुकानातून कितीही उसनं प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानातून प्रेम घेण्याकरिता कोणीही इथे तयार नाही.
त्यामुळे तुमची मोहब्बत की दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रेम हे मनात असावं लागतं. दुकानात कधीच प्रेम मिळत नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तसेच ज्यावेळी नागपुरमधील काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांना ठोकाठोकी करुन एकमेकांचे कपडे फाडले त्यावेळी यांची मोहब्बत की दुकान कशी आहे हे लक्षात आलं, असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली आहे. ओबीसी नेत्याला संपवण्यासाठीच २५ राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.