रिल्स बनवण्यास पतीचा विरोध; संतापलेल्या पत्नीने आयुष्यातूनच उठवलं

Crime News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स अनेक कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यातून कधीकधी विचित्र घटनाही घडताना पाहायला मिळतात. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे पतीने रील्स बनवण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश्वर कुमार राय याचं सहा ते सात वर्षांपूर्वी फफौत येथील तरुणीशी लग्न झालं होतं. महेश्वर हा कामानिमित्त कोलकाता इथं राहत होता. मात्र सुट्टी असल्याने तो नुकताच घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नी राणी हिला इन्स्टाग्रामवर रील्स बनवू नको, असं सांगितलं.

मात्र राणीला महेश्वरची ही मागणी मान्य नव्हती. काहीही झालं तरी मी रील्स बनवणारच, असं तिने निक्षूण सांगितलं. त्यानंतर पती-पत्नीत वाद होण्यास सुरुवात झाली. महेश्वर हा फफौत या आपल्या सासुरवाडीत गेला होता. मात्र तिथं राणी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी महेश्वरची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.

रात्री साडेदहा वाजता कोलकाता इथं काम करणाऱ्या महेश्वरच्या रुदल नावाच्या भावाने त्याला फोन केल्यानंतर महेश्वरचा फोन दुसऱ्याच कोणीतरी उचलला. त्यामुळे शंका आल्याने रुदल याने आपल्या वडिलांना महेश्वरची सासुरवाडी असलेल्या फफौत इथं जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. खोदाबंदपूर येथील फफौत गावात ही हत्येची घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी राणीची चौकशी सुरू असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.