रेमन चक्रीवादळाने टेन्शन वाढवलं ; या भागात अतिवृष्टीचा अंदाज, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

मुंबई । एकीकडे देशातील अनेक भागात उन्हाचा कहर वाढला असून यामुळे नागरिकांचे डोळे आता मान्सूनकडे लागले आहे. मात्र यातच येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमन चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलं की, शनिवारी रात्रीपर्यंत रेमन चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे.रविवारी वाऱ्यांचा ताशी वेग १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो. परिणामी २६ आणि २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.

रेमन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर २४ आणि दक्षिण २४ परगणा, त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
आयएमडीच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. काही भागात उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.