रेल्वेचा भीषण अपघात ! मालगाडीची एक्स्प्रेसला जोरदार धडक, 5 जण ठार, 25 जखमी

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. न्यू जलपाईगुडी येथे एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातात ट्रेनचा चक्काचूर झाला आहे. मालगाडीच्या धडकेनंतर कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनचा डबा हवेत लटकला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

पश्चिम बंगालमध्ये आज सोमवारी सकाळी हा रेल्वे अपघात झाला. टक्कर इतकी भीषण होती की तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. मालगाडीने मागून धडकलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे हे प्रवासी डबे नव्हते, असे सांगण्यात येत आहे. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकही बचाव कार्यात गुंतले आहेत.

याबाबत असे की, आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. हा अपघात एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. तर पाच प्रवाशांचा मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर एक विशेष हेल्पलाइन बूथ तयार करण्यात आला आहे. हेल्पलाइन क्रमांक आहेत:- 03323508794, 033-23833326 जारी केले आहेत. या घटनेबाबत माहिती किंवा मदत मागणारे प्रवासी या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. प्रवाशांना अधिक मदत करण्यासाठी नैहाटी स्थानकावर अतिरिक्त हेल्प डेस्कही तयार करण्यात आला आहे. नैहाटीमधील हेल्पलाइन क्रमांक आहेत- रेल्वे क्रमांक ३९२२२, बीएसएनएल क्रमांक ०३३-२५८१२१२८.