जळगाव : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डच्या आधारावर जे धान्य घेतो त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ असलेलं आपण बघतो. गहू, तांदळामध्ये बऱ्याचदा छोटे मातीचे खडे आणि इतर कचरा आपल्याला बघायला मिळतो. धान्य शेतातून येत असल्याचं आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. पण या धान्यात थेट प्लास्टिकची भेसळ केली जात असल्याचं तुम्हाला सांगितलं तर ? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण असा प्रकार यावल तालुक्यात समोर आला असून, याबाबत लाभार्थ्यांकडून तक्रार करण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात आलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यात शासनाव्दारे संचलीत १२४ अशी स्वस्त धान्य वितरण करणारी दुकाने आहेत. या स्वस्त धान्य दुकानातून प्रतिमाह ४३ हजार ७०० शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात येत असते. मात्र यावेळी वितरीत करण्यात आलेल्या तांदुळात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष धान्य गोदामावर जाऊन वितरणासाठी आलेल्या तांदुळाची तपासणी करणार असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी दिली.
भेसळयुक्त तांदूळ ओळखायचे कसे ?
बऱ्याचदा तांदूळ शिजत घालण्यापूर्वी आपण धुतो. तेव्हा तांदूळ पाण्यात बुडतो. चांगल्या प्रतीचं तांदूळ पाण्याच्या पृष्ठभागावरही स्थिरावतात. त्याचवेळी, प्लास्टिकचे तांदूळ पाण्यात तरंगू लागतात, कारण प्लास्टिकचे तांदळू कधीही पाण्यात बुडत नाही. त्यामुळे या ट्रिकमुळे आपण सहज भेसळयुक्त तांदूळ ओळखू शकता.
चावून सुद्धा कळेल
तांदूळ खरेदी करण्यापूर्वी, प्रथम तांदळाचे काही दाणे चावून खा. जर ते दर्जेदार असतील तर ते सहज चघळले जातील. परंतु जर त्यात भेसळ असेल, तर ते दातांना कडक लागतील. या टिप्सद्वारे आपण भेसळयुक्त तांदूळ ओळखू शकता.
तांदूळ भाजून घ्या
तांदूळ भाजूनही आपण कोणते तांदूळ भेसळयुक्त आहे, आणि कोणते नाही हे ओळखू शकता. यासाठी तव्यावर काही तांदुळाचा दाणे घाला. मंद आचेवर भाजून घ्या. जर तांदुळातून जळण्याचा वास येत असेल तर समजून जा की, तांदूळ हे भेसळयुक्त आहेत.
एक गाठ तयार होईल
जेव्हा तुम्ही भात शिजवता तेव्हा तांदूळ दाणेदार बनतो. अजिबात चिकटत नाही. त्याचवेळी, प्लास्टिकचा तांदूळ चिकटतो. त्याच्या गुठळ्या होतात. ही पद्धतदेखील खूप प्रभावी आहे.