मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विरोधकांनी सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मात्र लक्ष वेधलं ते शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या आंदोलनाने. रोहित पवार आज कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मुद्दावर कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून आंदोलनाला बसले आहेत. त्यावर अर्थमंत्री अजित पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. याचे पडसाद सभागृहात दिसत आहेत. याआधी यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आहे ?
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले, तेव्हा तेथील पावित्र्य राखलं पाहिजे, या उद्देशाने तिथं आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही, हे ठरलं आहे. रोहित पवार यांनी तिथं आंदोलन किंवा उपोषण करू नये. तसेच आपलं म्हणणं, सभागृहात येऊन मांडावे, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
अजित पवार काय म्हणाले आहे?
रोहित पवार यांच्या आंदोलनावर अजित पवार यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले की, या संदर्भातील पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र लिहून सांगितले की पाटेगाव खंडाळा (कर्जत जामखेड) येथील वसाहत औद्योगिक वसाहत जाहीर करण्याबाबत आपलं पत्र प्राप्त झालं आहे. यावर सर्व संबंधितांसोबत चर्चा करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, असंही म्हटलं.
दरम्यान आधिवेशनाला एकाच आठवडा झाला आहे. मंत्री महोदयांनी पत्र दिलं आहे. अधिवेशन संपलेलं नाही. लोक प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे चेरअमन आणि मंत्री महोदयांनी पत्र दिल्यानंतर याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. अशा पद्धतीने आंदोलन करणे उचित नसल्याचं रोहित पवार यांनी उद्देशून अजित पवार म्हणाले.