रविवार, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलियात पर्थ मधे टी – २० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली मॅच आपण सगळ्यांनीच पाहिली आहे.
किती छान हरलो की नाहीं आपण !
आपण हरलो हे निर्विवाद.
दक्षिण आफ्रिका जिंकली का हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.
चर्चा जरूर.
वाद जरासुद्धा नाहीं.
आणि याचे संपूर्ण श्रेय भारतीय क्रिकेट मधला सगळ्यात जास्त लाडावलेला खेळाडू…. माननीय श्री रोहित शर्मा.
Pampered ला आपल्या सभ्य मराठीत नेमके काय म्हणायचे हे मला कळत नाहीये म्हणून लाडावलेला इतकेच म्हणले. त्याचा शब्दकोशात दिलेला अर्थ ” फाजील लाड ” असा आहे हे मला पूर्ण माहिती असूनसुद्धा.
बघा ना!
या पठ्ठ्यने त्यादिवशी टॉस जिंकला.
आणि काय केलं ?
पहिली बॅटिंग घेतली….
तीही पर्थावर…
तीही दक्षिण आफ्रिकेच्या विरुध्द…
त्यातही ते चार चार फास्ट बॉलर्स खेळवत असताना… रबाडा, पार्नेल, इंगिडी, नॉर्जे…
प्रत्येकाची उंची सहा फूट किंवा त्यापेक्षही जास्त!
अरे, हे सगळे वर्षानुवर्ष आयपीएल मधे खेळत आहेत.
बॉल स्विंग होतो आहे…
बॉल अक्षरश: उडत होता त्यादिवशी…
आणि
हे महाराज म्हणतात की आमची पहिली बॅटिंग….
तोफेच्या तोंडीचे अस्खलित….
अरे पांडुरंगा, ती काय आपल्या गच्चीतली मॅच आहे का ?
माझी गच्ची, माझी बॅट म्हणजे माझी पहिली बॅटिंग !!!
अरे, आपला आकार काय आणि किती; आणि आपला प्रकार काय ?
हे म्हणजे अगदी शेअर – बाजारा सारखे झाले….
एकदम आयते कोलीत हातात.
” आंधळा मागतो एक,….”
पण हातात दोन आले ते दक्षिण आफ्रिकेच्या .
आपल्या नव्हे.
अरे रोहित शर्मा, बाळा, शेअरबाजारात ओल्याबरोबर सुके जळते तसे सगळे भारतीय फलंदाज त्यादिवशी जळले की रे!
” महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळी वाचती ” या न्यायाने सूर्यकुमार यादवचा काय तो अपवाद…. कोसळत्या बाजारातही एखादा एशियन पेन्ट्स, लार्सन टूब्रो, टीसीएस चालतो तसा!
मित्रा रोहित शर्मा, तू एकदम एलयासी सारखा वागलास की रे ! ” भरांवशाच्या म्हशीला ….” म्हणतात तसे !
एक सिक्स मारलीस आणि तू परत…
मुंबईच्या क्लब क्रिकेटमधे म्हणतात तसे ” रोहित , तुला आई बोलावते आहे ” असे का रे कोणी तुला म्हणत होते ?
हल्ली बरेच वेळा म्हणत असावेत.
त्यात तुला एकटे एकटे वाटू नाहीं याची जबाबदारी के. एल. राहुल घेतोच.
शेअरबाजारात एलआयसी, झोमाटो, पेटीएमला म्हणतात रे तसे….
रोहित शर्मा आणि शेअरबाजार…..!!!!
त्यादिवशी बॅटिंगमधे ना तू खेळलास, ना राहुल, …
नुसते कागदावर मोठे
तुम्ही ना पाकिस्तान विरुद्ध खेळणार, ना दक्षिण आफ्रिका विरुध्द.
तुम्ही खेळायचे म्हणजे सारखे नेदरलँड कुठून आणायचे?
हे म्हणजे ना कौतुकाने महत्त्वाचे म्हणून सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या शेअरबाजाराच्या महत्त्वाच्या निर्देशांकात जास्त वेटेज देत घ्यावे तर बाजार कोसळताना तुम्हीच पहिले कोसळता !
रोहित शर्मा आणि शेअरबाजार…..
बॅटिंग झाली .
वाटले तू फिल्डीन मधे तरी …
शेअरबाजारात नाहीं का लिस्टिंगच्या वेळी चांगला भाव मिळाला नाहीं तरी नंतर मिळेल असे वाटत राहते ना….
पण इथेही ये रे माझ्या मागल्या…
चक्क विराट कोहलीने कॅच सोडला.
तू म्हणालास …
मी कॅप्टन आहे ना…
म्हणून विराटने एक कॅच सोडला तर तू दोनदा रन – आऊट गमावलेस….
नको तिथे कुठे त्याच्याबरोबर स्पर्धा!
लिस्टिंग बरोबर लिस्टिंग नंतरहि एलआयसी पडत राहातो तसे!
तरीही रोहित शर्मा आणि शेअरबाजार दोन्ही विषयी आम्हांला मनोमन एक आपुलकी.
कारण दोघेही आमच्या सारखेच मध्यमवर्गीय!
क्रियेतही आणि प्रतिक्रियेतहि !
ना तू विराट कोहली सारखा मोकळेपणाने रडणार , ना मोकळेपणाने आनंद व्यक्त करणार ; ना तोंडभरून शिवी देणार !
तो कोहली कसा पाकिस्तान विरुद्ध मजबूत खेळला आणि मग मस्त रडला !!
तुझे तसे नाहीं.
पाकिस्तान विरुद्धच्या त्याच मॅचमधे टॉसनंतर आपले राष्ट्रगीत झाले. त्यानंतर डोळे घट्ट मिटून तू जो चेहरा केलास ना तो आमच्या घरातल्या क्रिकेटच्या कर्त्या पुरुषाचा होता….
दबाव आहे हे मान्य करणार पण निसटतेच दाखवणार….
वाटले हे हवे आहे….
पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध सगळे मुसळ….
हे म्हणजे पडत्या बाजारात सरकारी वित्तसंस्थांनी शेअरबाजार सावरावा तसे ….
रोहित शर्मा आणि शेअरबाजार….
तो कोहली कसा….
सहकाऱ्याला शिवी सुध्दा मनमोकळेपणाने देतो.
तुझा शिवी देताना सुध्दा चेहरा आवाज म्युट केल्यासारखा असतो…
संसारात नवऱ्याचा असतो तसा….
आणि न बोलता शेअरबाजार एखाद्याला पाडतो तसा.
अनुष्का शर्मा सगळ्यांना नाहीं रे….
रोहित शर्मा आणि शेअरबाजार…
रोहित, तुझी एक जाहिरात आहे.
त्यात तू क्रिकेटर झाला नसतास तर केकवाला झाला असतास असे दाखवले आहे.
त्या जाहिरातीत तू केकवर मेणबत्ती लावायला जातोस आणि तो केकच ढेपाळतो असे दाखवले आहे.
त्यादिवशी मैदानात तुझे तसे काहीतरी होत होते.
असू देत.
नसतो एखादा दिवस एखाद्याचा.
आम्ही सगळे अशी संधी तुला आणि शेअरबाजाराला देत असतो.
बाकीच्यांना नाहीं मिळत ती.
खोटे वाटते ?
आठव…
अरे, त्या बिचाऱ्या भुवनेश्वरकुमारने जेमतेम दोन – तीन मॅच मधे ती एकोणासावी ओव्हर वाईट काय टाकली…. आयुष्याच्या शिव्या खाल्ल्या रे त्याने.
त्या कोवळ्या अर्षदीपने एक कॅच काय सोडला… किती ट्रोल झाला तो…
पण तुला कोण काय बोलले रे !!!
असे तुला न बोलण्यात तू भारतीय संघाचा कॅप्टन आहेस, अंबानींच्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहेस हे नसते , तर आम्हांला सगळ्याना तू आणि शेअरबाजार आमचे वाटता रे !!!
आम्हांला वाटत असतें की तू क्रिकेटर झाला नसतास तर आमच्या सारखाच गल्लीत वडा – पाव खात फिरताना दिसला असतास !
रोहित शर्मा आणि शेअरबाजार…..
अरे रोहित शर्मा बाळा, तो भुवनेश्वर, तो अर्षदीप, तो दिनेश कार्तिक बघ…
ते कसे उसळून उठतात.
आपली कामगिरी उंचावतात.
तुझे सगळे वेगळेच!
तरीही तू आणि शेअरबाजार आम्हांला जवळचे वाटतात.
त्याचे कारण तुम्हां दोघांचा Lazy Elegance…
आम्हांला तो लुभावतो.
पण परवडत नाहीं.
तुम्ही दोघे मात्र तो मस्त मिरवता….
रोहित शर्मा आणि शेअरबाजार…
पण खरं म्हणजे आपल्यापैकी कोणालाच रोहित शर्मा आणि शेअरबाजार यापैकी कोणालाही नावे ठेवण्याचा जरासुद्धा नैतिक आधिकार नाहीं.
कारण मुळात आपण स्वतः आणि शेअरबाजार व रोहित शर्मा यात जरासुद्धा फरक नाही.
आपणच तर एकमेकांना लाडावून ठेवले आहे.
वेळप्रसंगी आपण एकमेकांना जरी नावे ठेवली, अगदीं टोकाची नावे ठेवली तरी मनोमन आपले स्वतःवर प्रेम असते.
मनोमन आपले रोहित शर्मावर प्रेम असते
मनोमन आपले शेअरबाजारावर प्रेम असते.
कारण आपण वेळप्रसंगी तसे मुद्दामून, ठरवून, जाणीवपूर्वक वागलेले नसतो तर त्या त्या वेळी नकळत आपाल्या हातून तसे घडले असते, घडून गेलेले असते यावर आपले प्रेम असते.
आपण असेच असतो.
रोहित शर्मा असाच असतो.
शेअरबाजार असाच असतो.
एकंदरीत काय ,
रोहित शर्मा आणि शेअरबाजार यात असणारे अत्यंत महत्त्वाचे साम्य म्हणजे या दोघांच्या बाबतीत आपण आपले ” One in hand is better than two in bush ” हे तत्त्व खुंटीला टांगून ठेवले आहे.
कायमचे नसले तरी अनेकदा
आपण, रोहित शर्मा आणि शेअरबाजार….
चन्द्रशेखर टिळक