लक्ष द्या! उष्णतेचा परिणाम पशुधनांवरही, प्रशासन केलं आवाहन

मुंबई : देशात उन्हाने कहर केल्या असून मानवाच्या दैनंदिन व्यवहारावर जसा परिणाम जाणवतोय, तसाच परीणाम पशुधनांवरही आढळून येत आहे. उष्णलहरी मुळे जनावरांची क्रयशक्ती, प्रजननक्षमता, रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच उत्पादनात कमी होते. पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या अनमोल पशुधनाची उन्हाळयांत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, आता प्रशासनाकडून जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले असून, सोबतच जनावरांचं बचाव करण्यासाठी उपाययोजनाची माहिती देण्यात आली आहे.

जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असतांना चरण्यास सोडावे. हवामान पुरक गोठयात त्यांना बांधावे. गोठ्याची उंची जास्त असली की गोठ्यात हवा खेळती राहील. छप्पराला शक्यतो पांढरा चुना,रंग लावावा. तसेच त्यावर पाला पाचोळा, तुराट्या, पाचट टाकावे ज्यामुळे सुर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.

सोबतच जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पाणी पिण्यांस द्यावे. आवश्यकतेनुसार पाण्यांत मिठाचा वापर करावा. बैलांकडून मशागतीची कामे शक्यतो सकाळी व सध्यांकाळी कमी उन्हांत करुन घ्यावीत. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भुक मंदावते. त्यामुळे शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईंपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर युरीया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यांत सुध्दा आवश्यक दुध उत्पादन मिळविणे शक्य आहे.

जनावरांना वेळोवेळी जंतनाशके पाजावी, जनावरांचे नियमितपणे लाळ्याखुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इ. रोग प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. चाऱ्यामध्ये एकदम बदल करण्यांत येवु नये. पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असावी. मृत जनावरांची विल्हेवाट लावतांना ती जागा पाण्याच्या तलावापासुन, सार्वजनिक ठिकाणापासुन दूर व संरक्षित असावी. कुठल्याही परिस्थितीत त्यांना कडक उन्हात चरावयाला सोडू नये. जनावरे दाटीवाटीने गर्दीने जवळ बांधु नयेत. वातावरणातील तापमान वाढीचे परिणाम पशुधनाच्या शरीर क्रियेवर होवुन पशुधन आजारी पडू शकते किंवा दगावण्याची शक्यताही असते.

उष्माघात किंवा उष्णलहरीच्या प्रकोपाचा प्रभाव झालेले पशुधन ओळखणे अत्यंत महत्वाचे असते. अशा पशुधनात धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा खाण्यांत लक्षनीय घट, पशुधन सुस्तावते, लाळ गाळते, नाकपुडया कोरड्या पडतात. जनावरांच्या शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थेत औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असुन गरजेनुसार व जास्त प्रमाणात उष्माघाताची लक्षणे दिसुन आल्यांस नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यातील पशुवैद्यकाची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.