राहुरी (जि. अहमदनगर) : पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने भाकर- तुकड्याची सोय व्हावी, म्हणून दुसरे लग्न केले; पण नवविवाहित तरुणीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला चहातून गुंगीचे औषध दिले. अन् घरातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली. लग्न लावून देणाऱ्या दलालांनीही दोन लाख रुपये घेऊन नवरदेवाची आर्थिक फसवणूक केली. ही घटना धामोरी खुर्द येथे घडली.
कानिफनाथ श्रीरंग थोरात (वय ५०, रा. धामोरी खुर्द) यांची पत्नी २०१८ मध्ये मयत झाली. घरात दुसरी कोणती महिला नसल्याने कानिफनाथ थोरात व त्यांच्या मुलाचे हाल होऊ लागले. दरम्यान, वांबोरी येथील तिघा जणांनी लग्न जुळवण्याच्या बदल्यात कानिफनाथ यांच्याकडून दोन लाख रुपये रोख घेतले, त्यानंतर १३ डिसेंबर रोजी एका तरुणीसोबत वांबोरी येथील एका मंदिरात लग्न लावले.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी नवविवाहित तरुणीने कानिफनाथ यास चहा करून दिला. चहा प्यायल्यानंतर कानिफनाथ यांना गुंगी आल्याने ते झोपले. ही संधी साधून त्या तरुणीने सोन्याच्या दागिन्यांसह पलायन केले.