लग्नासाठी मुलगी बघायला गेला अन् जबरीने हिसकावला मोबाईल, तरुणानं गाठलं पोलीस स्टेशन

नंदुरबार :  स्थळ पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा जबरीने मोबाईल हिसकावून घेतले. शिवाय सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

गुजरात राज्यातील किरणभाई देसाई हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुलगी बघण्यासाठी प्रकाशा (ता. शहादा) येथे पोहोचले. मुलगी दाखविणारे रविभाई रा. शहादा हे त्यांना भेटले, तेथे लग्नासाठी दोन मुलींचे स्थळ दाखविले परंतु, चार ते पाच दिवसापूर्वी व्हॉट्सऍ़पवर लग्नासाठी दाखविलेल्या स्थळातील मुलींचे फोटो व प्रत्यक्ष दाखविले स्थळहे वेगळे असल्याचे  किरणभाई देसाई यांना लक्षात आले. त्यानंतर  किरणभाई देसाई यांनी स्थळ बघण्यासाठी नकार देवून घरी जाण्यासाठी निघाले.

दरम्यान, रविभाई रा. शहादा यांनी स्थळ पाहण्यासाठी आणलेल्या दोन मुलींना नंदुरबार येथे सोडून देणेबाबत विनंती केली. त्या  वाहनातील दोन मुलींपैकी एका मुलीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करुन वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन चालकाने वाहन थांबविताच 30 ते 35 वर्षे वयोगटातील 7 इसम आले. दमदाटी करुन त्यांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेवून गेले.

जबरीने मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी करु लागले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वाहन तेथून जात असताना पोलीसांना काही तरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले, पोलीसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता संशयीत  इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी पाठलाग करुन 4 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.

किरणभाई रामजीभाई देसाई यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी  साईनाथ उदयसिंग ठाकरे रा. धमडाई ता.जि. नंदुरबार , नितेश नथ्थु वळवी रा. कोळदा ता.जि. नंदुरबार , रणजित सुभाष ठाकरे रा. कोळदा ता.जि. नंदुरबार , विशाल शैलेंद्र लहाने रा. नंदुरबार व 3 महिला यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे  निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक  दिनेश भदाणे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली ही कामगीरी केली.