‘वेळेत लग्न लावा, मिळवा पाच हजार’, ‘या’ तालुक्यातील मराठा समाजाला आवाहन

पहूर ता.जामनेर :  विवाह सोहळा म्हटला म्हणजे लगीनघाई, लग्नाची लगबग, घाई गरबड ही आलीच. त्यातच जुन्या रूढी परंपरा म्हणजे लग्नात आहेर देणे, वराकडील मंडळींचे स्वागत, गळाभेट यात बराचवेळ खर्ची होत असतो. नवरदेवाच्या लग्न मिरवणूकीत डीजे, बँडवर नाचणारी मंडळी तर ऐकायलाच तयार नसते. त्यामूळे लग्नाला विलंब होत असतो. ऐन उन्हाळ्यात आबालवृध्दांना याचा त्रास होत असतो. लग्न वेळेवर लागत नाही. वऱ्हाडी मंडळी ताटकळत राहते. यासाठी कुंभारी सिम येथील उद्योजक तथा सकल मराठा समाजाचे कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पुढाकार घेत प्रेरणादायी स्तृत्य उपक्रम राबविण्यास सुरूवात केलीय. अर्थात  ‘लग्न वेळेवर लावल्याचे कळवा, मिळवा पाच हजार रुपये’, असे आवाहन तालुक्यातील मराठा समाजाला केले आहे.

 वऱ्हाडी मंडळीची गैरसोय टळणार !

लग्न उशिरा लागल्यामुळे वऱ्हाडी मंडळीची गैरसोय टाळता येईल. उष्माघातामुळे होणारे दुष्परिणामाला आळा बसेल. यामुळे वधूपित्याला होणारा त्रास कमी होईल.

 पहिले बक्षिस सोनाळा ग्रामस्थांना 

या उपक्रमाची दखल घेत सोनाळा येथील शरद पाटील यांच्या मुलाचे लग्न वेळेवर लावून प्रथम बक्षिस मिळविले.  दुसरे बक्षिस मिळविण्याचा मान देखील सोनाळा गावानेच मिळविला.

जामनेर येथील विशाल लाॕन्स येथे ३० मार्च रोजी सोनाळा येथील शिंदे परिवारातील अरुण पाटील यांची कन्या रुपाली तर चाळीसगाव येथील चंद्रकांत पाटील यांचा मुलगा मोहन यांचा शुभविवाह वेळेवर लावण्यात आला. लग्न वेळेवर लावण्यासाठी नवरदेव शिंगाईत हनुमान मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेथून लग्न मंडपाचे अंतर दीड किलोमिटर होते. नाचगाण्यामुळे लग्न वेळ चूकणार होती. मात्र वधूपित्याने वरपित्याला लग्न वेळेवर लावण्याची विनंती केली असता वरपिता चंद्रकांत पाटील यांनीही दुजोरा देत नवरदेवासाठी आणलेली बग्गी परत करीत बग्गीवाल्याला ठरलेले १५,००० रुपये दिले. नवरदेव कार मध्ये बसून लग्न मंडपात पोहचला व लग्न वेळेवर लावण्यात आले.

 

आवाहन केल्यानूसार मराठा समाजाचे कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पाच हजाराचे बक्षिस वर वधूंच्या हाती दिले. यावेळी डाॕ प्रशांत भोंडे, डाॕ प्रशांत पाटील, डी एन चौधरी, निळकंठ पाटील , दिपक तायडे यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर व-हाडी मंडळी उपस्थित होती.

मराठा समाजाने या विवाहाची प्रेरणा घेऊन व्यर्थ खर्च टाळीत, वेळेचे महत्व जाणून लग्न वेळेवर लावावेत व बक्षिस जिंकावे असे आवाहन आबासाहेब पाटील यांनी वधूवरांना आशीर्वाद देत यावेळी केले.

 

जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजातील आदर्श विवाह वेळेवर लावल्याची माहिती मिळाली ,तरी त्या वधूवरांना पाच हजाराचे जाहिर केलेले बक्षीस देण्यात येईल. सकल मराठा समाजाने प्रेरणा घेऊन वेळेवर लग्न लावावे. हाच यामागील उद्देश आहे.
– आबासाहेब पाटील ,कार्याध्यक्ष ,सकल मराठा समाज जामनेर