तरुण भारत लाईव्ह । ५ जुलै २०२३ । आजसहीत गेल्या चारपाच दिवसात वायुवेगाने घडत असलेल्या घटना पाहता राज्याच्या राजकीय वातावरणात निर्माण झालेले चक्रीवादळ केव्हा थांबते व त्याचे राजकीय परिणाम केव्हा समोर येतात हे आजच सांगता येणार नसले तरी बारामतीच्या पवार कुटुंबात निर्माण झालेल्या वादळाच्या पहिल्या फेरीत पुतणे अजितदादा पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली, असे निश्चित म्हणावे लागेल.अजितदादांचे व्यक्तित्व आक्रमक असले तरी शरद पवारांच्या तुलनेत त्याना बचावाचीच भूमिका घ्यावी लागेल असे वाटत होते पण दादांनी या प्रकरणात प्रथमपासूनच आक्रमक भूमिका घेतली व दिवसअखेरपर्यंत कायम ठेवून काकांवर मात केली.
संख्या आणि रणनीती या दोन दृष्टीनी आजच्या दोन्ही गटांच्या बैठकीना महत्व होते.कुणाच्या बैठकीत किती आमदार पोचतात हा पहिला मुद्दा व कोण अधिक आक्रमक होतो हा दुसरा मुद्दा.त्यापैकी पहिल्या मुद्याचा फैसला राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 32 आमदारानी दादांना प्रतिसाद देऊन त्यांच्या भूमिकेला बळ दिले तर 16 आमदार शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले.हे बलाबल किती काळ टिकते हा प्रश्न असला तरी आज तरी दादांनीच बाजी मारली या निष्कर्षाप्रत यावे लागते.
दोन्ही गटांनी अवलंबिलेल्या रणनीतीबाबत बोलायचे झाल्यास त्या बाबतीतही दादांनीच बाजी मारली असे म्हणावे लागेल.कारण इतक्या लवकर प्रकरण शक्तिपरीक्षेपर्यंत पोचेल अशी काकागटाने अपेक्षा केली नव्हती.पण दादांनी तडकाफडकी निर्णय घेऊन आमदारांची बैठक बोलावली व या रणनीतीचा त्याना फायदाही मिळाला.
कारण दादांनी बैठक बोलावल्यानंतर काकांच्या गटाला ती बोलावणे भागच पडले.आमदारांची संख्या आपल्याकडे कमीच राहील हे त्याना ठाऊक होते पण शक्तिप्रदर्शन करणे ही त्यांची मजबूरी होती. दादा गटाची एक आणखी एक रणनीती आज दिसून आली व तीही सफल झाली.ती म्हणजे अन्य सर्व नेत्यानी शरद पवारांना ‘विठ्ठल’, ‘ दैवत’ बनवायचे, त्यांचा पूर्ण सन्मान राखायचा आणि दादांसाठी मैदान खुले सोडायचे , अशी रणनीती निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.याच चौकटीत बसणारी भाषणे छगन भुजबळांपासून तर धनंजय मुंडेंपर्यंत आणि सुनील तटकरेंपासून तर प्रफुल्ल पटेलांपर्यंत सर्वानी केली.अजितदादांचे भाषण मात्र त्या पठडीतले नव्हते.दादांनी काकांवर ठोस पुरावे सादर करून असा हल्ला चढविला की, त्यामुळे काकांचा गट घायाळ होणे अपरिहार्यच होते व सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या त्वेषपूर्ण भाषणांमधून त्याचा प्रत्ययही आला व तसाच संकेत शरद पवारानीही आपल्या भाषणातून दिला.
या सर्व घटनांचा राजकीय,निष्कर्ष आज लगेच काढता येणार नाही.त्यासाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागेल. त्याबाबत घाई न करणेच श्रेयस्कर ठरेल.
ल त्र्यं. जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर