धुळे : शिक्षक पती, पत्नीचे थकीत वेतन देण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयात गिरी यांना हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी महिला अधिकारी यांच्या मोबाइलचा डाटा तपासला जात असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यात त्या संबंधिताशी कोडवर्डमध्ये बोलत आहेत. एका ठिकाणी त्यांनी ‘साहेबांनाही पैसे द्यावे लागतात’, असे म्हटले आहे. तो संबंधित ‘साहेब’ कोण, याचा शोध घ्यावयाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने लाचखोर महिला अधिकारी गिरी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला आहे. परंतु, हे थकीत वेतन त्यांना मिळाले नाही. या संदर्भात त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी यांना ही रक्कम देण्यासाठी गिरी यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली.
या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत, मीनाक्षी गिरी यांना मंगळवारी कार्यालयातच दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. यावेळी त्याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सायंकाळची वेळ असल्यामुळे बुधवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी न्यायालयात सुनावणी वेळी सरकारी वकील यांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, गिरी व तक्रारदार यांच्यात मोबाइल संभाषण एका कोर्डवर्डद्वारे झाले आहे. त्यानुसार, ‘मंजूर झालेल्या बिलातून साहेबांना देखील पैसे द्यावे लागतात’, असा उल्लेख आढळला आहे. त्यामुळे तो ‘साहेब’ कोण ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.