लाचखोर ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात, जळगावातील कारवाईने खळबळ

जळगाव : कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून करण्यासाठी ७ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रंथपालला लाचलुचपथ विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे चाळीसगाव तालुक्यातील करगाव आश्रमशाळेत ४१ वर्षीय कर्मचारी यांच्यात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी जळगावच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी “फोन-पे” वर श्रीकांत गुलाब पवार (३८) रा. माध्यमिक आश्रम शाळा करगाव ता.चाळीसगाव यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर नाशिक येथील प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभागातून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ रूपये १६ टक्क्याप्रमाणे १२ हजारांची लाच ग्रंथपाल श्रीकांत पवार यांनी मागितली. तडजोडअंती ७ सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच सापळा रचून तो यशस्वी करण्यात आला.

दरम्यान, या लाचखोरीची पाळेमुळे ही खोलवर रूजली असून यात अन्य अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.