लाचखोर पुरवठा निरिक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात, पंधराशे रूपयांची लाच भोवली

तळोदा : रेशन कार्ड बनवून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून एक हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पुरवठा निरिक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. येथील महसूल विभाग कार्यलयात गुरुवार, २२ रोजी ही कारवाई करण्यात आली. प्रमोद डोईफोडे (रा.शिवण बिल्डिंग, महसूल कर्मचारी वसाहत, नंदुरबार) असे लाचखोर पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांचे रेशनकार्ड नसल्याने, तक्रारदार यांनी त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी ढोईफोडे, पुरवठा निरीक्षक यांच्याकडे फॉर्म भरून सादर केला होता. यावेळी पुरवठा निरीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी एक हजार ५०० रूपयांची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक यांना एक हजार दिले होते. यानंतरही डोईफोडे यांनी तक्रारदार यांचे रेशन कार्ड बनवून दिले नव्हते.

रेशन कार्ड बाबत तक्रारदार यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता, तक्रारदार यांच्याकडे उर्वरित पैश्यांची मागणी केली. गुरुवार, २२ रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत डोईफोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.  याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाई दरम्यान डोईफोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारली लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नंदुरबार तसेच कार्यवाही पथक विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महाले सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांच्या पथकाने हि कारवाई केली.