मुक्ताईनगर । आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव फेरफार करण्यासाठी ६ हजाराची लाच घेताना मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपायाला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मनोज सूर्यकांत घोडके (ग्रामसेवक) आणि सचिन अशोक भोलाणकर (शिपाई) असे लाचखोरांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.
राजुरा येथील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव फेरफार करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र ती फेरफार करण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके याने तक्रारदारास ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.
त्यांनतर जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचून राजुरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांना ११ हजारांपैकी सहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पर्यवेक्षक अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पो. नि. अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे यांच्या पथकाने कारवाई केली