लेकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले डॉ. विजयकुमार गावित; पोहचले दूर्गमभागात

मंत्री डॉ. विजयकुमार गावित ही करताहेत दूर्गम गावांमधून डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ दौरे

नंदुरबार – महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी त्यांचे पिताश्री तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे स्वतः दुर्गम भागापर्यंत मतदारांशी संपर्क करून आपल्या लेकीसाठी परिश्रम घेत आहेत. तर, डॉ. हिना गावित यांच्या लहान भगिनी तथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित या सुद्धा गावागावात संपर्क करत आहे.

दरम्यान मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काल दिनांक 2 मे 2024 रोजी शिरपूर तालुक्यातील बोराडी, पळासनेर आणि अन्य गावपट्ट्यात प्रत्यक्ष संपर्क केला. तसेच आज दिनांक 3 मे 2024 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील वेली, काकड खुंट आणि अन्य दुर्गम गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे, बैठका घेणे, स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला.

या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेस कडून केला जात असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत. भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांच्या खोडसाळपणा करून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ क्लिपचा आधार घेत आरक्षणाला धोका असल्याचे वारंवार खोटं सांगत आहेत.

संविधानाला धोका असल्याचे सांगून दिशाभूल करतात. वास्तविक काँग्रेस राजवटीतच शेकडो वेळा संविधानामध्ये त्यांनी पाहिजे तसे बदल केले आहेत, असे डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही. अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.