लोकसभा निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? महाराष्ट्रातील हे नाव चर्चेत

नवी दिल्ली । नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसानंतर म्हणजेच ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे अख्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र याच दरम्यान भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा याचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमले जाणार आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याआधी भाजपने जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत वाढवला होता. आता निकालानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षामुळे महाराष्ट्र संघटनेतही मोठे फेरबदल होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या जागी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा आहे.तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. यासोबत भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, नेमके हे बदल कोणते असणार? भाजप कोणते मोठे निर्णय घेणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.