नवी दिल्ली । २०२४ ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे देशभरातील राजकारणात दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडत असताना दिसत आहे. विशेष लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत असून अशातच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
सुरेश पचौरी यांनी 9 मार्च रोजी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री मोहन यादव आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
सुरेश पचौरी हे गांधी घराण्याशी जवळीक
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पचौरी हे गांधी कुटुंबाचे अत्यंत जवळचे मानले जातात. सुरेश पचौरी यांच्याशिवाय माजी खासदार गजेंद्रसिंह राजुखेडी यांनीही शनिवारी भाजपचे सदस्यत्व घेतले. सुरेश पचौरी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते. तर काँग्रेसनेही त्यांना चार वेळा राज्यसभेचे खासदार केले.
या नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला
सुरेश पचौरी यांच्याशिवाय शनिवारी धारचे माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी, इंदूरचे माजी आमदार संजय शुक्ला, पिपरियाचे माजी आमदार विशाल पटेल, अर्जुन पालिया आणि एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष अतुल शर्मा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
सुरेश पचौरी यांचा राजकीय प्रवास 1972 मध्ये सुरू झाला. त्यानंतर ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात आले. त्यानंतर 1984 मध्ये ते प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1984 मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले. 1990, 1996 आणि 2002 मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. त्यांना केंद्रात राज्यमंत्रीही करण्यात आले. संरक्षण, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन याशिवाय त्यांनी संसदीय कामकाज आणि पक्षाची तळागाळातील संघटना असलेल्या काँग्रेस सेवा दलाची जबाबदारीही घेतली.