लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, आता ‘या’ नेत्याचा राजीनामा

लोकसभा  निवडणूक अगदी जवळ आली असून याचदरम्यान, काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीय. यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला. गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

याआधी बुधवारीही बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गौरव वल्लभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काँग्रेसचा राजीनामा देत एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी काँग्रेस दिशाहीन असल्याचा आरोप केला.

गौरव वल्लभ म्हणाले की, जेव्हा मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असल्याचा माझा विश्वास होता. येथे तरुण आणि बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते, परंतु गेल्या काही वर्षांत माझ्या लक्षात आले आहे की पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन विचारांसह तरुणांशी जुळवून घेऊ शकत नाही.

गौरव वल्लभ पुढे म्हणाले की, अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे, पक्षाची ही भूमिका मला नेहमीच अस्वस्थ करत असे. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात. यासोबतच ते म्हणाले की, सध्या पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू आहे. एकीकडे आपण जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाज विरोध करताना दिसतो.