लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीबाबत अजित पवारांचे मोठं विधान

मुंबई : शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा होत आहे. तर, तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असे अद्याप काहीही ठरले नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यावरुन विधान सभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मोठ विधान केलं आहे.

एकीकडे महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकांसाठी जागा-वाटपावरुन चर्चा सुरू असताना, मविआत राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) हा मविआत तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे, या शब्दांत सोमवारी डिवचले. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी होईल का? अशी चिन्हे दिसू लागली असतांना यासंदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढणार का? असा प्रश्‍न एका पत्रकाराने विचारल्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले. १०० टक्के एकत्र राहणार आहे, तू स्टँप आण, मी लिहून देतो तुला. मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सह्या करुन देतो तुला, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने महाविकास आघाडी एकत्रितपणेच निवडणुका लढवणार असल्याचे उत्तर पत्रकाराला दिले. अशा प्रकारच्या चर्चा चालत असतात, एक पक्ष असला तरी एकाच पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणारे नेते असतात. पण, यासंदर्भात अंतिम निर्णय हा त्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते करत असतात.