लोकसभा २०२४ : भाजपाची टिफिन पार्टी संकल्पना नेमकी काय?

पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) आणायचा आणि प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, विविध मंत्री; तसेच उच्चपदस्थ नेत्यांसमवेत एकत्र जेवण करीत संवाद साधायचा, असे या पार्टीचे स्वरूप आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या टिफिन पार्टी स सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर जिल्ह्यात, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात नुकतेच या ‘टिफिन पार्टी’चे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चा पर्याय शोधण्यात आला असून, त्यानिमित्ताने त्या त्या विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख; तसेच इतर कार्यकर्त्यांची संवाद साधण्यात येत आहे.

येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था, पुढील मार्च होणार्‍या लोकसभा-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी भाजपने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या ‘टिफिन पार्टी’चे केंद्रीय स्तरावरून आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या चार हजार बैठका देशभर घेतल्या जाणार आहेत. जेवणासोबतच संवाद साधण्यात येणार आहे. कार्यकर्ता आणि पक्षातील नेता, यामध्ये कुठलेही अंतर राहणार नाही, यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.