लोकसभा : महिलांसाठी सर्वात मोठे असलेले विधेयक आता आज संसदेच्या वरच्या सभागृहात म्हणजेच राज्यसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी माहिती देताना सांगितले की, महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मंजूरीसाठी मांडले जाणार आहे. लोकसभेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर काल म्हणजेच बुधवारी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात दोन मते पडली. यासह हे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला केले वंदन
सोशल नेटवर्किंग साइट X वर ट्विट करताना त्यांनी लिहिले की, नवीन सदनाची नारी शक्ती वंदन कायद्याने चांगली सुरुवात झाली आहे. यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे.त्याला सर्वच राजकीय पक्षांचे ऐतिहासिक पाठबळ लाभले असून, विकसित आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी हा एक मैलाचा दगड ठरेल. मी सर्व खासदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो.काही पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला म्हणजेच नारी शक्ती वंदन कायद्याला पाठिंबा दिला आहे, ज्यामध्ये महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे त्यांचे दिवंगत पती राजीव गांधी यांचे स्वप्न असल्याचे वर्णन केले आहे. विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लोकसभेतील महिला खासदारांची टक्केवारी 14 टक्क्यांवरून 33 टक्क्यांवर जाईल. त्यामुळे ज्या राज्यांच्या विधानसभांमध्ये 15 टक्केही महिला आमदार नाहीत, तिथे आता ही संख्या 33 टक्के होणार आहे.