गडचिरोली । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना राज्यातील काँग्रेसची गळती काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी राजीनामा दिला आहे.
गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज आहेत..
डॉ. नामदेव उसेंडी हे 2008 पासून काँग्रेसमध्ये असून 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस तर्फे लोकसभा लढवली होती. मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. आताही ते इच्छुक होते, मात्र बाहेर जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्ष सोडण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.
“२०१४च्या मोदी लाटेत कोणी इच्छुक नसतानाही मी लढलो. ३ लाख मते घेतली. त्यानंतर सतत ५ वर्ष या मतदारसंघात काम केले. त्यानंतर २०१९च्या लोकसभेत १ लाखाने मतदान वाढले. त्यानंतरही मी सतत जनसंपर्कात होतो. मात्र स्थानिक राजकीय गटबाजीमुळे मला गडचिरोली चिमुर लोकसभेचे तिकीट मिळाले नाही,” यामुळेच मी राजीनामा देत असल्याचे नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे.