भडगाव : आगामी लोकसभा, विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच येथे शिवसेना (उबाठा) युवासेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची गुरूवार, १५ फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, भडगावात पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची सभा होत असून ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडले, असे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी म्हटले आहे.
भडगाव येथील सभास्थळी सोमवारी भेट देऊन कामाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उध्दव ठाकरे हे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
दोन वर्षापूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे अदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे. आपल्या वडीलांची तब्बेतीकडे लक्ष देवून त्यांनी स्वत: आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई जिल्हा दौऱ्यावर
गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे. त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.