जळगाव : पारोळा तालुक्यातील महामार्गावरील सावखेडा होळ येथे मध्यरात्री बारा ते दीडच्या दरम्यान तीनशे ते साडेतीनशे शेतकऱ्यांनी महामार्गावर रस्ता रोको केला. परिसरात अघोषित भारनियमन होत असल्याने वीज वितरण उपकेंद्र येथे संताप व्यक्त करून उद्रेक केला.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यायचे नियमन वीज मंडळाने करून दिले आहे. त्यानुसार मागील आठ दिवस हे रात्रीचे सावखेडे होळ व त्या परिसरातील शेतकऱ्यांना मिळाले होते. पुन्हा ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत रात्रीचे आवर्तन या परिसरातील शेतकऱ्यांना वीज मंडळांनी दिले होते. परंतु ३१ ऑगस्टच्या रात्री मुंबई कळवा वीज वितरण केंद्रातून रात्री अकरा वाजता इमर्जन्सी करावा. असे आदेश पारोळा १३२ उपकेंद्रास मिळाले. त्यानुसार सावखेडा फिडर लोड शेडिंग अंतर्गत बंद करण्यात आले.
वीज बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सावखेडा होळ वीज उपकेंद्र कार्यालय गाठले तेथे ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त केला. महामार्गावर रस्ता रोको केला हा रात्री बारा वाजेपासून दीड वाजेपर्यंत सुरू होता. मात्र घटनेची तीव्रता व माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता गौतम मोरे घटनास्थळी पोहचले. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता रात्रीची आवर्तनाची वेळ बदलवून १ ते ४ तारखेपर्यंत सकाळी सव्वानऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंतच वीज वितरण केल्या जाईल असे आश्वासन दिले.