गणेश वाघ
भुसावळ : दानापूर-एक्स्प्रेसमधून 29 चिमुकल्यांची भुसावळात तर 30 चिमुकल्यांची मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी सुटका करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. चिमुकल्यांची रेल्वेद्वारे तस्करी होत असल्याचा यंत्रणेला संशय असलातरी अटकेतील मौलाना यांनी चिमुकल्यांना सांगलीतील मदरसा येथे शिक्षणासाठी नेले जात असल्याचा जवाब यंत्रणेला दिला आहे. नेमका खरा प्रकार काय? याचा उलगडा पोलिसांच्या सखोल तपासाअंती समोर येणार आहे. शिक्षणासाठी मुलांना नेले जात असताना चिमुकले प्रवास करीत असलेल्या रेल्वे बोगीऐवजी मौलाना जनरल कोचमध्ये का बसले ? चिमुकल्यांना शिक्षणासाठी नेले जात असल्यास त्यांच्या पालकांची संमतीपत्रे सोबत का नव्हती? असा प्रश्न आहे तर अल्पवयीन मुले कुठून आणली, कुणाकडे नेली जात होती? याबाबत ठोस माहिती न मिळाल्याने लोहमार्ग पोलिसांनी भादंवि 370 हा मानवी तस्करीचा कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. संशयिताची पोलीस कोठडीत विचारपूस केल्यानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येणार आहेत.
अल्पवयीन मुले पूर्णिया जिल्ह्यातील
भुसावळसह मनमाड येथे सुटका करण्यात आलेली 59 मुले ही मुस्लीम असून आठ ते पंधरा वयोगटातील आहेत शिवाय सर्व बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सांगलीतील तैयबे एज्युकेशन वेलफेअर फाऊंडेशन मदरसा व यतीमखाना, एमआयडीसी कुपवाड, जि.मिरज येथे त्यांना नेले जात असल्याची माहिती अटकेतील संशयित मौलाना मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहार, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) यांनी यंत्रणेला दिली आहे मात्र चिमुकल्यांना शिक्षणासाठी नेले जात असताना संबंधिताकडे कुठलाही पुरावा नव्हता शिवाय पालकांचे संमतीपत्रही नव्हते त्यामुळे यंत्रणेचा संशय बळावल्यानंतर संबंधिताविरोधात भादंवि 370 अन्वये मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाला ट्वीट अन यंत्रणेची कारवाई
01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 10 वरून अॅड.भन्तेंद्रो पाठक (समिस्तापूर) हे प्रवास करीत असताना याच बोगीत काही मुले ही पालकाविना प्रवास करीत असल्याचे लक्षात आले शिवाय मुले तहानलेली व भूकेली असल्याचे लक्षात आल्यानंतर अॅड.पाठक यांनी रेल्वे बोर्डाला त्याबाबत ट्वीट केले. त्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना यांना मंगळवारी दुपारी दिड वाजता संदेश मिळताच त्यांनी जळगाव समतोल प्रकल्पाचे एनजीओ महेंद्र चौधरी व लोहमार्गचे भुसावळ निरीक्षक विजय घेर्डे, सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांना माहिती कळवली. मंगळवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी वाजता गाडी प्लॅटफार्म क्रमांक तीनवर येताच एस- 10 व 11 बोगीची तपासणी केल्यानंतर त्यातून 29 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले मात्र यावेळी त्यांच्यासोबत कुणीही नव्हते. एका बालकाच्या माहितीनंतर एका जनरल कोचमधून मौलाना उतरल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे सर्व चिमुकल्यांकडील तिकीट हे जनरल कोचचे असलेतरी चिमुकले स्लीपर डब्यातून दोन दिवसांपासून प्रवास करीत असताना त्यांना कुणीही हटकले नाही तर चिमुकल्यांकडील तिकीटे हे मौलानाकडील बॅगेतच असल्याचे कारवाईनंतर स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळात मुलांना दिले जेवण व पाणी
सूत्रांच्या माहितीनुसार, रविवार, 28 मे रोजी सायंकाळी सहा वाजता दानापूर येथून गाडी हलली व तेथूनच चिमुकल्यांनी प्रवास सुरू केला. प्रवासात पोटभर जेवण न मिळाल्याने व पाण्याअभावी चिमुकले प्रचंड अस्वस्थ झाली होती. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना जेवण व पाण्याची व्यवस्था करीत त्यांची मायेने विचारपूस करीत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळनंतर या चिमुकल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर साध्या वेशातील महिला व पुरूष कर्मचार्यांमार्फत त्यांना जळगाव येथील बालगृहात पाठवण्यात आले तर मनमाड येथील 30 मुलांना चाईल्ड हेल्प डेस्क एनजीओ, नाशिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. भुसावळात यंत्रणेसोबत ‘समतोल’चे महेंद्र चौधरी, प्रतिभा महाजन, प्रशांत पाटील आणि दीपक पाचपांडे चार प्रतिनिधींनी सहकार्य केले.
मनमाड स्थानकावर 30 मुलांची सुटका
दानापूर एक्स्प्रेसमध्ये आणखी काही मुले गाडीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरपीएफ एएसआय प्रकाश थोरात व आरक्षक अवधेश कुमार यांना मनमाडपर्यंत पाठवण्यात आले व मनमाड लोहमार्ग निरीक्षक शरद जोगदंड व आरपीएफ निरीक्षक संदीप देसवाल यांना माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने दानापूर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 1, 2, 10 व 11 मधून 30 मुलांची सुटका केली तर चौघांना अटक केली.
मौलानाविरोधात भुसावळात गुन्हा
भुसावळात 29 चिमुकल्यांची सुटका केल्यानंतर या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात निरीक्षक आर.के.मीना यांनी बुधवारी पहाटे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा आशय असा की, अल्पवयीन मुलांना बालमजुरीसाठी नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी भुसावळात कारवाई केली मात्र बालकांसोबत कुणीही जवाबदार व्यक्ती नसल्याने त्यांना भुसावळात उतरवण्यात आले तर एका अल्पवयीनाने दिलेल्या माहितीनुसार मौलाना मोहम्मद मंजूर आलम यास भुसावळात अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भादंवि 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांची भुसावळात भेट
बालकांची रेल्वेतून तस्करी होत असल्याच्या संशयानंतर लोहमार्गचे प्रभारी पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी बुधवारी दुपारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात भेट देत तपासाधिकारी निरीक्षक घेर्डे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेत तपासाबाबत काही सूचना केल्या. दरम्यान, संशयित मौलानाला भुसावळ लोहमार्ग पोलिसात हजर केले असता 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर मनमाडमध्ये पकडण्यात आलेल्या चौघत्त संशयितांना न्यायालयाने 12 पोलीस कोठडी सुनावली. तपास अनुक्रमे भुसावळचे पोलीस निरीक्षक विजय घेर्डे व मनमाड लोहमार्गचे निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत.