जळगाव : जिल्ह्यासह एरंडोल तालुक्यात आज १२ रोजी दुपारी चार वाजता अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट हजेरी लावली. त्याचवेळी नागदुली शिवारातील शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने तरुणाचे वडील थोडक्यात बचावले.
एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील ( ३५ ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. आज शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळीवारासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील यांच्यासह काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते.
दरम्यान, श्रीकांत पाटील हा तरुण लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्याचे वडील भिका पाटील यांच्या समोर झाली. त्यांनी तात्काळ शेजार्यांच्या मदतीने वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी मयत घोषित केले.
दरम्यान, एकुलता एक मुलगा गेल्याने वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. मयताच्या पश्चात आर्ई, वडील, मुलगा, दोन मुली तसेच पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.