वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

नवी दिल्ली : आयसीसी वन डे वर्ल्डकप २०२३ चे वेळापत्रक आज जाही करण्यात आले. सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी एकूण १० स्थळे असतील. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता आहेत.

विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही हे यातून स्पष्ट होते. याशिवाय पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये खेळायचा आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तीन सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. आता बातमी येत आहे की, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे.

संपूर्ण भारतीय संघाचे वेळापत्रक

८ ऑक्टोबर वि ऑस्ट्रेलिया चेन्नई
११ ऑक्टोबर वि अफगाणिस्तान दिल्ली १
१५ ऑक्टोबर वि पाकिस्तान अहमदाबाद
१९ ऑक्टोबर वि बांगलादेश पुणे
२२ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड धरमशाला
२९ ऑक्टोबर वि. इंग्लंड लखनऊ
२ नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ मुंबई
५ नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता
११ नोव्हेंबर वि. क्वालिफायर १ बंगळुरू