वसंत मोरे काँग्रेसमध्ये जाणार का ? काँग्रेस नेते मोहन जोशी मोरेंच्या भेटीला

वसंत मोरे यांनी १२ मार्च रोजी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त करत दुपारी थेट राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट शेअर केली होती. तसेच मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण वारंवार माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काही न काही आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. जेव्हा पासून मनसेत आहे तेव्हापासून मी स्वकेंद्रीत राजकारण करत आलो, असं माझ्याबद्दल बोललं गेलं. तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आणि वागणुकीवर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, आज काँग्रेस नेते मोहन जोशी हे वसंत मोरे यांच्या भेटीला आले आहेत. यावेळी वसंत मोरे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे वसंत मोरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.