वसईत भयंकर हत्याकांड; आता राज्य महिला आयोगाकडून दखल

भररस्‍त्‍यात प्रियकराने प्रेयसीची निर्घृणपणे हत्‍या केल्‍याची घटना वसई येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रेयसीची हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेतली गेली आहे. रूपाली चाकणकर यांनी आरोपीवर आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश दिले आहेत.

वसई येथील घडलेली घटना अतिशय हिंसक आहे. भर रस्त्यात अशी घटना घडते ही चिंताजनक आहे. अनेकांनी बघायची भूमिका घेतली. याप्रकरणी आरोपीला कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पोलीस निरीक्षक नन्नवरे यांना फोन करून आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोपीवर कडक कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग लक्ष घालेल, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

रूपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हणाल्या की, वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल. मुलांचे असे हिंसक वागणे, हत्या करण्यापर्यंत मजल जाणे आणि सोबतच अशी घटना घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणे चिंताजनक असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे.