वाघोड येथून बेपत्ता झालेला मुलगा सापडला यावलमध्ये; रावेर पोलिसांचे कौतुक

रावेर : वाघोड येथून बेपत्ता झालेला भगवान बारेला (८) हा सहाव्या दिवशी यावल तालुक्यात ‘पावला’ आहे. या शोधमोहीमीमुळे रावेर पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

रावेर पोलीस स्टेशन येथे २७ मे रोजी हरवल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये वाघोड ता.रावेर येथील भिमसिंग पारसिंग बारेला यांचा नातु रुपेश भगवान बारेला (8 ) हा २४ मे रोजी दुपारी अडीच वाजता बाजारातुन कोणास काही एक न कळविता कोठेतरी निघुन गेला होता. रुपेश याचे काका अर्जुन भिमसिंग बारेला यांचे फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास रावेर पोलीस स्टेशन कडील पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांचे कडेस देण्यात आला होता. हरवलेल्या मुलाचा सर्वत्र शोध सुरु होता. जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन तसेच रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील खानापुर चोरवड पाल अजंदा कुसुंबा अशा आजुबाजुच्या परीसात देखील सातत्याने शोध सुरु होता.

शोध घेत असताना खानापुर येथील बस स्टॉप परिसरात सदर मुलास काही दुकानदारांनी पाहिल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर सदर मुलाचा शोध घेत असतांना तो यावल तालुक्यातील धुळ्यापाडा गावात असल्याबाबत माहीती मिळाली ही माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी फैजपुर उपविभागाच्या सहा. पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांना व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांना देवुन सदर मुलास सुखरुपपणे धुळ्या पाडा ता. यावल येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला त्याच्या परीवाराच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याच्या तपासकामी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी केला. सदर गुन्हा तपासात रावेर पोलीस स्टेशन कडील पोहेकॉ अर्जुन सोनवणे, पोकों सचिन घुगे, पोकों रविंद्र भामरे यांनी मदत केली आहे.