जळगाव : जळगावातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झालाय. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशांपर्यंत गेला. मात्र अशातच उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने जळगावातील दिवसाच्या तापमानात मोठी घट झालीय. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहराचे तापमान ३१ अंशखाली नोंदविले गेले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जळगावात गारवा वाढला असून यामुळे रात्री आणि पहाटच्या वेळेस थंडी जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर जळगाव शहराचे कमाल तापमान ३७ अंशावर गेले होते. यामुळे दिवस उन्हाच्या झळा बसत होते. किमान तापमानात देखील वाढ झाल्याने रात्रीचा गारवा हरवला होता.हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी चार महिन्यात जिल्ह्यात यंदा फारसा गारठा जाणवला नाही. मात्र, आता मार्च महिन्यात ऋतुमान बदलण्याचा काळ सुरु असताना, नेहमी मार्च महिन्यात तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होत असते.
मात्र अशातच हिमालयात सुरु असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम जळगावच्या वातावरणावर होताना दिसत आहे. रविवारी नंतर सोमवारी जळगावचे तापमान ३१ अंशाखाली नोंदविले गेले. अचानक तापमानात घट होऊन गारवा वाढला.