वारकर्‍यांच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदे आणि विखे-पाटील खेळले फुगडी; पहा व्हिडीओ

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने आज पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरावर विठूनामाचा गजर सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात पार पडली. शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाकडे बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मागितले.

महापूजेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पंढरीमध्ये प्रदूषण मुक्त वारी पंढरीच्या द्वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी टाळ वाजवत विठू नामाचा गजर केला. तसेच वारकर्‍यांनी साहेब प्लिज, प्लिज म्हणत फुगडी खेळण्याचा आग्रह केला. त्यानंतर वारकरर्‍यांच्या विनंतीला मान देत एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत फुगडी देखील खेळली.

आषाढी वारीत वारकर्‍यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकर्‍यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकर्‍यांचे दर्शन जलद व सुलभ झाल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.