पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच; पोलिसासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : वाळूच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या अडावदमधील पोलीस कर्मचार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी (35, रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद) व होमगार्ड चंद्रकांत काशीनाथ कोळी (36, रा.कोळीवाडा, अडावद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

साहेबांच्या नावाने मागितली लाच
चोपडा येथील 32 वर्षीय तक्रारदाराचे ट्रॅक्टर असून ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. या ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हद्दीतून वाळू वाहतूक होवू देण्यासाठी दरमहा साहेबांना पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून चार हजारांची मागणी आरोपी गोसावी यांनी शनिवारी केल्यानंतर जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. होमगार्ड कोळी यांच्याकडे लाच देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी कोळी व नंतर गोसावी यांना पोलीस ठाण्याच्या आवारातून दोघांना अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.