वाळू माफियांची मुजोरी : मुक्ताईनगरातील पोलिस ठाणे आवारातून लांबवला वाळूचा डंपर

भुसावळ (गणेश वाघ) : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचा महसूल पथकाने सिनेस्टाईल वरणगाव ते मुक्ताईनगरदरम्यान पाठलाग करून डंपर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात लावले मात्र मुजोर वाळू माफियांनी थेट पोलिस ठाण्याच्या आवारातून डंपर लांबवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डंपर पळवून नेण्यात आला की पाणी नेमके कुठे मुरले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वाळू माफियांनी मुजोरी आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत वाढत गेल्याने सुज्ञ जनतेतून या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळाधिकारी तायडे, वरणगाव तलाठी पारीसे, साकेगाव तलाठी तायडे, कोतवाल जितेश तायडे हे अवैध वाळू वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत असताना शुक्रवार, 13 रोजी मध्यरात्री 1.35 वाजता दीपनगर गेटजवळ विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे व ‘रूबाब’ लिहिलेले तसेच 7020570780/9421000725 क्रमांक लिहिलेले डंपर भरधाव वेगाने जात असताना पथकाने डंपरला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने डंपर पळवल्याने महसूल पथकाने वरणगाव पोलिसांच्या मदतीने डंपरचा पाठलाग सुरू केला. डंपर चालकाने सर्विस रोडवरून डंपर उतरवत चांगदेव रोडवरून वळवल्यानंतरही पथक पाठलाग करीत राहिले. एका शेतात चालक वाहन सोडून लपून बसल्यानंतर पथकाने मुक्ताईनगर पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलिस आले व चालकाला पुन्हा डंपर पोलिस ठाण्यात आणण्याचे बजावले व यावेळी संबंधित वाहनाच्या मालकाने पावती असल्याचे सांगितले मात्र कोणतीही पावती सादर न करण्यात आल्याने वाहन मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात दंडात्मक कारवाईसाठी लावण्यात आले. हा सर्व प्रकार शुक्रवारी पहाटे 1.35 ते 3.58 वाजेपर्यंत सुरू होता.

पोलिसांच्या पहार्‍यातून डंपर पळवले
मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी लावलेले डंपर घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी भुसावळातील महसूल पथक गेल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे डंपर वाळू माफियांनी पळवून नेल्याची माहिती पोलिसांनी पथकाला दिल्यानंतर पथकाला मोठा धक्काच बसला. भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी ही बाब प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कळवल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या कानावर हा प्रकार घातला.

पोलिस अधीक्षकांनी घडलेला प्रकार जाणून घेत पळवलेला डंपर तातडीने आणण्याबाबत मुक्ताईनगर पोलिसांना आदेश दिले आहेत. पोलिसांच्या पहार्‍यातून डंपर पळवण्यात आल्याने वाळू माफियांची मुजोरी पुन्हा समोर आली आहे तर ‘खाकी’च्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते म्हणाले की, सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातून डंपर पळवण्यात आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही डंपरचा शोध घेत आहोत.