विकासकामांवरून आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली, डॉ. हीना गावित यांचं थेट आव्हान

नंदुरबार : अमृत भारत योजनेंतर्गत येथील रेल्वे स्टेशनच्या बाजुलाच नव्याने इमारत बांधण्यात येणार असून, यासाठी  सुमारे ११ कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी खा. ॲड गोवाल पाडवी यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करत निधी मंजूर केल्याचे सांगितले. तर काल माजी खा. डॉ.हीना गावितांनी माझ्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेवू नये, खासदारांनी नवीन कामे मंजूर करुन श्रेय घ्यावे, असं आव्हान दिलंय. यामुळे या विकासकामांवरून आजी-माजी खासदारांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत योजना सुरू केली. या योजनेत नंदुरबार रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला यासाठी ११.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत आता विविध सुविधा करण्यात येत आहेत, असे डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत रेल्वेस्थानकाच्या शेजारी म्हणजे दुसरा बाजुला नव्याने रेल्वेस्थानकाची इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत सद्यः स्थितीत असलेल्या रेल्वेस्टेशनसारखी ‘हेरीटेज तूक राहणार आहे. त्याच पद्धतीचे बांधकाम यात विविध आधुनिक सोयी, सुविधा राहणार आहेत. याशिवाय रेल्वे पट्ट्याच्या पलिकडे म्हणजेच पटेलवाडी, गिरीविहार, सिंधी कॉलनी आदी भागातील रहिवाशांसाठी रेल्वेस्थानकाच्या विरुद्ध बाजुला तिकीट खिडकी उभारण्यात येणार आहे. या खिडकीचा फायदा रेल्वे पश्चापतिकडील फॉर्म नंबर चारही नव्याने उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया ही ५ जून रोजी पूर्ण होऊन वर्कऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे अनेकवेळा रेल्वे आल्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो किंवा रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते. त्यामुळे या योजनेंतर्गत अशा ठिकाणी अंडर पास तयार करण्यात आले आहेत. या अंडरपासमुळे वाहनधारकांचा खोळंबा होणार नाही. नंदुरबार शहरातील नळवे रोडवरील अंडरपास मध्ये पाणी साचत्याने अनेकवेळा हा रस्ता बंद असतो. याबाबत रेल्वे विभागाने नगरपालिकेला सूचना करून तेथे असणाऱ्या अंडरग्राऊंड ड्रेनेजबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे त्या म्हणल्या.

नंदुरबार पुणे गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पुणे येथे शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे त्यासाठी नंदूरबार रेल्वे स्थानकावरून नंदुरबार -पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. रेत्वे गाडीची टाइमिंगची अडचण असल्यामुळे ह्या कामाला उशीर होत आहे. पण सातत्याने पाठपुरावा करून लवकरच नंदुरबार पुणे गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही डॉ. हीना गावित यांनी सांगितले.

अमृत भारत योजनेंतर्गत मोदी सरकारने असंख्य कामे मंजूर करून दिलेली आहेत, हे सर्व माझ्या कार्यकाळात या कामांना गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली असून, कामदेखील सुरू होणार आहे. मात्र, विद्यमान खासदार हे रेल्वेस्टेशनवर येवून आम्हीच हे काम केले आहे. असे भासवून लोकांची दिशाभूल करीत आहेत, प्रत्यक्षात ५ जूनला या कामांची वर्कऑर्डर निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये. हवे तर त्यांनी रेल्वे विभागाकडून आम्ही केलेल्या कामांची यादी घ्यावी. आम्ही केलेल्या कामांपैकी जी कामे राहून गेली असतील, त्या कामांबाबत नव्याने प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करावा व त्या कामांचे खुशाल श्रेय घ्यावे.
– डॉ. हिना गावित, माजी खासदार, नंदुरबार लोकसभा