भुसावळ : विजेचा धक्का लागून कर्मचारी जखमी झाल्याची घटना 4 जून 2022 रोजी घडली होती. या घटनेत रेल्वे कर्मचार्याचा डावा पाय कमरेखालून कापावा लागला होता. दरम्यान, कुठलेही प्रशिक्षण दिले नसताना कर्मचार्यास पोलवर चढवल्याने हा अपघात घडल्याचा आरोप जखमी कर्मचार्याच्या नातेवाईकांनी केला होता. अखेर भुसावळ शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर अशोक तायडे (25, पंतनगर, ग्रामपंचायत समोर, मलकापूर) हे एम.ओ.एच.कार्यालयाच्या शेडमध्ये कामाला होते. 4 जून 2022 रोजी सकाळी ८.३० वाजता उदय टोंगे, चेतन चौधरी व इतर सहकार्यांनी तायडे यांना इलेक्ट्रीक पोलवर चढण्यास सांगितले. मात्र, तायडे यांना कुठलेही प्रशिक्षण दिले नसताना, सुरक्षिततेची साहित्य पुरवले नसताना तसेच वीज प्रवाह सुरू आहे वा नाही याची खातरजमा न करता कर्मचार्यास काम सोपवण्यात आल्याने त्यांना विद्युत शॉक लागला व ते खाली पडल्याने डाव्या पायास व कमरेस गंभीर दुखापत झाली.
उपचारादरम्यान त्यांचा डावा पाय कमरेखालून कापावा लागला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पूनम अशोक तायडे (27, मलकापूर) यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिल्यावरून वरील संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.