पंढरपूर : अब की बार किसन सरकार असे म्हणत बी आर एस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणार्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रीमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. परवानगी मिळाली तर वारकर्यांवर पुष्पवृष्टी करणार आहेत.
महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे. यासाठी त्यांनी आषाढ शुद्ध नवमीची निवड केली आहे. या दिवशी चंद्रशेखर राव हे पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. देशात शेतकर्यांचे राज्य येऊ दे असे साकडे ते शेतकरी, कष्टकर्यांच्या या देवाला करणार असल्याची माहिती बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांनी सांगितले.
के चंद्रशेखर राव हे २७ जूनला पंढरपूरला येतील. विठ्ठल दर्शनासोबत ते वारकर्यांशी संवाद देखील साधणार आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे २८ जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत. आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.