विठ्ठल रुक्मिणीची महापूजा; आगळावेगळा विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर

पंढरपूर : महाराष्ट्रचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची सरकारी महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे पूजा संपन्न झाली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे या जोडप्यास पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यातील सर्व कष्टकरी, शेतकरी, सामान्य जनतेचे भले होवो अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

सरकारी प्रथेप्रमाणे आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकदशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी आषाढीची पूजा केली आहे. आता ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीची पूजा करण्याचा मानही मिळाला. असा मान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच नेते ठरले आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे पंढरपुरात आगमन होताच वारकर्‍यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांसोबत दिंडीत टाळ – मृदूंगाच्या तालावर ठेका धरला. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस दोघांनीही या दिंडीत सहभाग घेऊन खेळांचा आनंद लुटला. त्यानंतर पहाटे २ वाजता पांडुरंगाचं मुख्य पूजेस सुरुवात झाली. वैदिक मंत्रोच्चारात पांडुरंगाची विधिवत षोडशोपचारी पूजा संपन्न झाली.