मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या आमदारांसह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज दुपारी गोर्हे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोर्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोर्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखरे दुपारी नीलम गोर्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच, नीलम गोर्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेत ११ आमदार आहेत. त्यापैकी विप्लव बाजोरिया हे आधीच एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदेही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे गेल्या आहेत. विधानसभेचे ४० आमदार आधीपासूनच एकनाथ शिंदेंकडे आहेतच, आता विधानपरिषदेचेही ३ आमदार शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील शिवसेनेचं ठाकरे गटाचं जे संख्याबळ आहे, हे ११ वरुन कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.