विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, भाजपने कंबर कसली

मुंबई : यावर्षी पाच राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
निवडणूक आयोगाने या सर्व राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार येत्या ७ नोव्हेंबरला मिझोराममध्ये मतदान होणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर या दोन दिवशी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तेलंगणा ३० नोव्हेंबर तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच ३ डिसेंबर रोजी या पाचही राज्यातील निवडणुकांची मतमोजणी होईल.
दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील १६२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राजस्थानमधील ४१, मध्य प्रदेशमधील ५७ आणि छत्तीसगडमधील ६४ उमेदवारांची यादी पुढे आली आहे.


भाजपने राजस्थानमध्ये ७ विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. तर छत्तीसगडमध्ये २ खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत १३६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत ५७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत २४ मंत्र्यांसह सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनीमधून निवडणूक लढवणार आहेत. दतिया येथून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना तिकीट देण्यात आले आहे. छत्तीसगडसाठी भाजपने दुसऱ्या यादीत ६४ उमेदवारांची घोषणा केली आहे.