विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील घडामोडीला वेग आला असून यातच अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. आता अशातच काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर आता हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे दोन्हीही नेते काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आहेत. या दोन्हीही नेत्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईपूर्वीच या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. हे दोन्ही आमदार लकवरच काँग्रेस पक्षाला रामराम करणार असून शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याचे बोललं जात आहे.