विनाकारण अटक करणं पोलिसांना भोवलं, हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली : विनाकारण एका व्यक्तीला पोलीस कोठडीत बंद करुन ठेवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना त्या व्यक्तीला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या पोलिसांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
मागील वर्षी एका व्यक्तीला विनाकारण पोलिस कोठडीत डांबून ठेवण्यात आल्याच्या याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा आदेश दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्लीच्या बदरपूर पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार आली होती. यात एका भाजी विक्रेत्याने एका महिलेवर चाकूहल्ला केल्याचे म्हटले होते.
ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे त्यांना एक महिला आणि एक व्यक्ती दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले. रात्री ११.०१ वाजतापासून तर ११.२४ पर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवले. दरम्यान, कोणतीही अटक किंवा एफआयआर न करता त्याला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
याबद्दल निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याला अटक न करता त्याला सरळ घटनास्थळावरून उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कोणत्याही कारणाशिवाय पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. नागरिकांच्या घटनात्मक आणि मूलभूत अधिकारांना डावलून पोलिस अधिकारी ज्या पद्धतीने वागले आहेत, ते भयावह आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.