मुंबई : जर तुम्ही ट्रेन, बस किंवा इतर सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असला तर त्याचे दरवाजे उघडणे किंवा खिडक्या उघडणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण हीच चूक जर तुम्ही विमानात केली तर मात्र तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय.
नागपूरहून बंगळूरला जाणाऱ्या इंडिगोच विमानाचे एमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. दरम्यान त्यामुळे या तरुणाला अटक करण्यात आली. सोमवार (2 ऑक्टोबर) रोजी पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
वृत्तानुसार, या तरुणाला अटक केल्यानंतर जामीनावर सोडण्यात आले आहे. स्वप्नील होले असं या आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E 6803 हे नागपूरहून बंगळूरच्या दिशेने उड्डाण करत होते. त्यावेळी या विमानात हा प्रकार घडला असल्याचं सागंण्यात येत आहे.